लिंबलोण उतरू कशी

लिंबलोण उतरू कशी असशि दूर लांब तू
इथून दृष्ट काढिते निमिष एक थांब तू

एकटाच मजसी तू उभ्या जगात लाडका
तूच दुःखसागरी उभविलीस द्वारका
सर्वभार घेतला असा समर्थ खांब तू

धन्य कूस आईची, धन्य कान, लोचने
कृतार्थ जन्म जाहला फिटुन जाय पारणे
अनंत कष्ट सोसले फेडिलेस पांग तू

शीणभाग संपला तृप्‍त माय जीवनी
आयु उर्वरित ते सरेल ईश चिंतनी
लाभले न जे कुणा असे सुदैव भोग तू
निमिष - पापणी लवण्यास लागणारा काळ.
लिंबलोण - दृष्ट काढण्याचे साहित्य.

 

मराठीवर प्रेम करता ?    शेअर करा