A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
मी पप्पाचा ढापुन फोन

मी पप्पाचा ढापुन फोन, फोन केले एकशे दोन !
"हॅलो, हॅलो" बोलतंय्‌ कोण?

"आमचे नाव घेलाशेठ, डोंगराएवढे आमचे पेट
विकत बसतो साजुक तूप, चापून खातो आम्हीच खूप !
तुम्ही कोण? काय तुमचं नाव? बोला झटपट कुठलं गाव?"

"कसले नाव नि कसला गाव, राँग नंबर लागला राव !"

मी पप्पाचा ढापून फोन, फोन केले एकशे दोन !
"हॅलो, हॅलो" बोलतंय्‌ कोण?

"लक्षुंबाई मी जोशाघरची, चोरून खाते अंडाभुर्जी
वरती कपभर दूध न्‌ साय, घरात आत्ता कोनी नाय
तुम्ही कोण? काय तुमचं नाव? बोला झटपट कुठलं गाव?"

"कसले नाव नि कसला गाव, राँग नंबर लागला राव !"

मी पप्पाचा ढापून फोन, फोन केले एकशे दोन !
"हॅलो, हॅलो" बोलतंय्‌ कोण?

"मी तर आहे अट्टल चोर, चंद्राची मी चोरून कोर
झालो अंधारात पसार, तारे उरले फक्त हजार
तुम्ही कोण? काय तुमचं नाव? बोला झटपट कुठलं गाव?"

"कसले नाव नि कसला गाव, राँग नंबर लागला राव"

मी पप्पाचा ढापून फोन, फोन केले एकशे दोन !
"हॅलो, हॅलो" बोलतंय्‌ कोण?

"ढगामधून बोलतोय बाप्पा, चल मारू थोड्या गप्पा"

"बाप्पा बोलतोयस? तर मग थांब
सगळ्यात आधी एवढं सांग
कालच होता सांगत पप्पा, तिकडे आलेत आमचे अप्पा
एकतर त्यांना धाडून दे, नाही तर फोन जोडून दे
तुला सांगतो अगदी स्पष्ट, अर्धीच राहिलेय्‌ आमची गोष्ट
त्यांना म्हणाव येऊन जा, गोष्ट पुरी करून जा
म्हणाले होते- जाऊ भूर्र, एकटेच गेले केवढे दूर !
डिट्टेल सगळा सांगतो पत्ता, तिकडे पाठव आमचे अप्पा
बाप्पा.. बाप्पा बोला राव, सांगतो माझं नाव न्‌ गाव"

कसले नाव नि कसले गाव, राँग नंबर लागला राव !
गीत - संदीप खरे
संगीत - सलील कुलकर्णी
स्वर- सलील कुलकर्णी, संदीप खरे
अल्बम - अग्गोबाई ढग्गोबाई
गीत प्रकार - बालगीत

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.