ॐकार अनादि अनंत अथांग

ॐकार अनादि अनंत अथांग अपरंपार
नादब्रह्म परमेश्वर सगूण रूप साकार

सूर स्पर्श सूर श्रवण
स्वरगंधित आश्वासन
तिमिराच्या गर्भी स्वर तेजोमय हुंकार

सूर साध्य स्वर साधन
सूर रूप स्वर दर्पण
स्वर भाषा स्वर चिंतन स्वर विश्वाकार

सप्‍तसूर स्वर्ग सात
स्वर सांत्वन वेदनांत
सुखनिधान संजीवक शाश्वत अमृतधार
सरांशी मैत्री झाल्यावर अनेकदा त्यांचा विषय मित्रांमधे निघायचा. मराठी गीतांची फारशी आवड किंवा ओळख नसलेल्यांना 'सुधीर मोघे' हे नाव फारसे माहितही नसायचे.

“सर, तुमची इतकी गाणी असूनही बरेचदा तुमची ओळख नाईलाजाने 'गोमू संगतीनं..' - म्हणजे तसं पाहायला गेलं तर ज्याला आजच्या भाषेत आयटम-सॉंग म्हणता येईल, हे गाणे ज्यांनी लिहिलंय ते, अशी करून द्यावी लागते. प्रेक्षकांच्या / श्रोत्यांच्या अशा या अज्ञानाचं तुम्हाला दु:ख वाटत नाही ?”

“एक सांगू का ? माझं अगदी स्पष्ट मत आहे.. की प्रत्येक गाणं आपापलं नशीब घेऊन जन्माला येत असतं. याचंच एक वेगळं उदाहरण तुला देतो.. अभिषेकी बुवांबरोबर निवेदक म्हणून मी बरेच दौरे केले. 'मत्स्यगंधा ते महानंदा' हा तर आमचा फार प्रसिद्ध कार्यक्रम. रागदारी वर आधारित अजून एक कार्यक्रमही आम्ही करत असू. याच दरम्यान त्यांच्या शिष्यांबरोबर चालणारा रियाज अगदी भरभरून अनुभवला. रागसंगीतावर आधारित 'अभोगी' नावाचा चित्रपट येऊ घातला होता.. स्वत: बुवा संगीत देणार होते. काही गाण्यांचे कामही झाले होते.. पण अखेरीस तो चित्रपट पुढे गेलाच नाही. माझी 'ओंकार अनादी अनंत..' ही कविता बुवांच्या 'दरबारी' मधील चिजेवर आधारित होती. पण त्याचे काम होण्याआधीच चित्रपट बंद पडला. पुढे इतक्या वर्षांनी मी ती सलील (कुलकर्णी) ला दिली.. त्याने तिला सुंदर चाल लावली आणि त्याच्या कार्यक्रमातून तो गातोही फार छान.. विशेष म्हणजे सलीलने हे गाणे शौनककडूनही गाऊन घेतले आहे. म्हणजे शेवटी वर्तुळ पूर्ण झालेच की नाही !

त्यामुळे एकदा लिहून झाले की फार चिंता विचार करायचा नाही.. जे ते आपल्या नशिबाने जाते. ”

अमित करकरे

( 'आठवणीतली गाणी'वर प्रसिद्ध झालेले ब्लॉग्ज कॉपी-पेस्ट करणे अनधिकृत आणि अनैतिक आहे. या लिखाणाचा कुठल्याही प्रकारे वापर करण्याआधी लेखकाची परवानगी घेणे बंधनकारक आहे. )

 

मराठीवर प्रेम करता ?    शेअर करा