फड सांभाळ तुर्‍याला ग

फड सांभाळ तुर्‍याला ग आला
तुझ्या ऊसाला लागंल कोल्हा

मूळ जमीन काळं सोनं
त्यात नामांकित रुजलं बियाणं
तुझा ऊस वाढला जोमानं
घाटाघाटानं उभारी धरली
पेरपेरांत साखर भरली
नाही वाढीस जागा उरली
रंग पानांचा हिरवा ओला

लांब रुंद पिकला बिघा
याची कुठवर ठेवशील निगा ?
सुरेख वस्तू म्हणजे आवतणं जगा
याला कुंपण घालशील किती ?
जात चोरांची लई हिकमती
आपली आपण धरावी भीती
अर्ध्या रात्री घालतील घाला

तुला पदरचं सांगत नाही
काल ऐकू आली कोल्हेकुई
पोट भरल्याविना काही ढेकर येत नाही
सार्‍या राती राहील कोण जागं ?
नको बोलण्याचा धरूस राग
बघ चिखलात दिसतात माग
कुणीतरी आला अन्‌ गेला
आवतण - निमंत्रण, बोलावणे.
कोल्हेकुई - कोल्ह्याचा आवाज.
फड - शेत, मळा.
बिघा - जमीन मोजण्याचे एक माप.

 

Random song suggestion
मराठीवर प्रेम करता ?    शेअर करा