A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
प्रबुद्ध हो मानवा

कणाकणांनी ज्ञान वेचुनी प्रबुद्ध हो मानवा
प्रज्ञेचा हा प्रकाश दावील मार्ग तुला रे नवा
प्रबुद्ध हो मानवा

सिद्धार्थाच्या हृदयांतरी ही ज्ञानज्योत चेतली
बुद्धमुखाने ह्या ज्योतीची प्रभा जगी फाकली
त्या दीपाने तूही चेतवी तव हृदयीचा दिवा
प्रबुद्ध हो मानवा

धम्मचिंतनी आचरणाची कळेल तुज संहिता
अष्टमार्ग हे निश्चित नेतील बुद्धत्त्वाच्या पथा
पंचशीलेचा निवास हृदयी निर्वाणास्तव हवा
प्रबुद्ध हो मानवा

मनोभूमीतुनी तुझ्या रुजावा बोधिवृक्ष हा पुन्हा
त्या शाखेची शीतल छाया लाभावी बहुजना
करुणाप्रेरित कार्य तुझे हे संजीवन दे जीवा
प्रबुद्ध हो मानवा
अष्टमार्ग - बुद्ध धर्मातील अष्टमार्ग- १. सम्यक दृष्टी २. सम्यक संकल्प ३. सम्यक वचन ४. सम्यक कर्म ५. सम्यक जीविका ६. सम्यक प्रयास ७. सम्यक स्मृती ८. सम्यक समाधी
धम्म - 'धम्म' हा पाली भाषेतील शब्द, 'धर्म' या 'योग्य व न्याय्य मार्ग' या संस्कृत शब्दावरून आला आहे.
पंचशील - बुद्ध धर्मातील पंचशील- १. हिंसेपासून अलिप्‍त राहणे, २. चोरी करण्यापासून अलिप्‍त राहणे, ३. व्याभिचारापासून अलिप्‍त राहणे, ४. खोटे बोलण्यापासून अलिप्‍त राहणे, ५. मादक वस्तूच्या सेवनापासून अलिप्‍त राहणे.
प्रज्ञा - बुद्धी, विचारशक्ती.
प्रबुद्ध - प्रौढ, विद्वान.
प्रभा - तेज / प्रकाश.
बुद्ध - ज्ञाता, जागृत झालेला.
बोधिवृक्ष - ज्ञानाचा वृक्ष. बोधगया येथील महाबोधी विहाराच्या पश्चिमेला असलेल्या पिंपळाच्या वृक्षाखाली सिद्धार्थ गौतम यांना इ.स.पू. ५२८ मध्ये वयाच्या ३५ व्या वर्षी संबोधी (ज्ञान) प्राप्‍ती होऊन ते बुद्ध झाले, तेव्हापासून पिंपळांच्या झाडाला बोधिवृक्ष संबोधिण्यात येते.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.