रघुपति राघव गजरी गजरी

रघुपति राघव गजरी गजरी
तोडित बोरे शबरी

ध्यानी जपली मनी पूजिली
रघुनाथाची मूर्त सांवळी
बघावयाला याच डोळी
आतुरलेली किती अंतरी

रामनाम ते वदता वाचे
अमृत लाघव अधरी नाचे
हाती येता फळ भक्‍तीचे
चाखित होती नाम माधुरी

भजनी रमुनी भिल्लिण शामा
म्हणते लवकर ये रे रामा
आलिंगुनीया भक्‍ति प्रेमा
स्वर्ग बघू दे मला भूवरी
अंतर - अंत:करण, मन
गजर - घोष
भू - पृथ्वी, जमीन
लाघव - आर्जव, कौशल्य
शबरी - एक भिल्लीण. श्रीरामांची एकनिष्ठ भक्‍तीण

 

मराठीवर प्रेम करता ?    शेअर करा