A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
श्रमता मार्गी विश्रामांची

श्रमता मार्गी विश्रामांची विसरू नको स्थाने
सांगतो तुज विस्ताराने

आम्रकूट तुज दिसेल ज्यावर पक्व फले गौर
पडता छाया तुझी काजळी त्याच्या अग्रावर
धरणिपयोधर त्यास मानतिल अमरांची मिथुने

दशार्णदेशी जाशिल तेव्हा, फुलतिल केवडकडे
घरटी करत्या ग्रामखगांनी गजबजतिल झाडे
तुजसह येतिल हंस, रंगतिल श्यामल जंबुवने

जरी लागली तरी करावी तिरकस ती वाट
उत्तरेस, बघ उज्‍जयिनीच्या सौधांचे घाट
लवता विद्युल्लता चकित तिथ ललनांची लोचने

बाणवनातिल देव वंदण्या थांब जरा पुढती,
कुरुक्षेत्रावर तिथून पुढे हो, जा ब्रह्मावर्ती
दमता जलदा, या स्थानावर शांति तुला लाभणे

हिमालयी जा कनखल शैली, मग कैलासाला
क्रौंच रंध्र मार्गात बघुनिया, प्यावे मानसजला
नजर टाक तू, तिथून अलका बघ आनंदाने
गीत - वसंतराव पटवर्धन
संगीत - पं. जितेंद्र अभिषेकी
स्वर- पं. जितेंद्र अभिषेकी
गीत प्रकार - कविता, गीत मेघ, मालिका गीते
  
टीप -
• गीत क्रमांक ४
• 'गीत मेघ' - अनुवादित 'मेघदूत'मधून
• वाहिनी- सह्याद्री, कार्यक्रम - 'प्रतिभा आणि प्रतिमा' (१९८०)
• निवेदन- ज्योत्‍स्‍ना किरपेकर
• सादरकर्ते- अरुण काकतकर
• ध्वनीफीत सौजन्य- डॉ. वसंतराव पटवर्धन
आम्रकूट (अमरकंटक) - मध्यप्रदेशातील विंध्याचल पर्वतरांगेतील एक पर्वत.
कनखल - पौराणिक कथांप्रमाणे दक्ष प्रजापती याची राजधानी.
क्रौंच रंध्र - विष्णुपुराणात उल्लेख केलेला 'क्रौंच द्वीप' हा एक पर्वत आहे, जो हिमायलाचा भाग आहे. या पर्वतापासून मानससरोवरापर्यंत जाण्याच्या मार्गास 'क्रौन्च रंध्र' असे म्हणतात.
खग - पक्षी.
जंबु - जांभुळ.
जलद - मेघ.
दशार्ण देश - मालवा प्रांत.
पयोधर - मेघ.
मिथुन - जोडपे.
शैल - डोंगर, पर्वत.
सौध - घरावरची / बंगल्यावरची गच्‍ची.
संपूर्ण कविता

श्रमता मार्गी विश्रामांची विसरू नको स्थाने
सांगतो तुज विस्ताराने

आम्रकूट तुज दिसेल ज्यावर पक्व फले गौर
पडता छाया तुझी काजळी त्याच्या अग्रावर
धरणिपयोधर त्यास मानतिल अमरांची मिथुने

विझव तयाचा वणवा, मिरविल आनंदे माथी
क्षुद्र मने ही कधी विसरती, उपकारा स्मरती
उच्‍च कुळांची कथा काय मग मी तुजला सांगणे

दशार्णदेशी जाशिल तेव्हा, फुलतिल केवडकडे
घरटी करत्या ग्रामखगांनी गजबजतिल झाडे
तुजसह येतिल हंस, रंगतिल श्यामल जंबुवने

उत्कट यौवन दाखवील जो नगरवासियांचे
प्रणयगंध दरवळत गुहांतुन जिथल्या गणिकांचे
नीचैर्गिरिवर विश्रांतीला त्यानंतर थांबणे

जरी लागली तरी करावी तिरकस ती वाट
उत्तरेस, बघ उज्‍जयिनीच्या सौधांचे घाट
लवता विद्युल्लता चकित तिथ ललनांची लोचने

अवंतीस कर महांकाळस्तव, तू सायंकाळी
आर्द्र गजाजिन पुरवुनि सांबा खुलव चंद्रमौळी
अभय अपर्णा तुज अवलोकोल प्रेम-स्तिमित नयने

बाणवनातिल देव वंदण्या थांब जरा पुढती,
कुरुक्षेत्रावर तिथून पुढे हो, जा ब्रह्मावर्ती
दमता जलदा, या स्थानावर शांति तुला लाभणे

हिमालयी जा कनखल शैली, मग कैलासाला
क्रौंच रंध्र मार्गात बघुनिया, प्यावे मानसजला
नजर टाक तू, तिथून अलका बघ आनंदाने

  संपूर्ण कविता / मूळ रचना

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.