A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
उघड उघड पाकळी

उघड उघड पाकळी, फुला रे,
उघड उघड पाकळी !

आंतल्या आंत कोवळें
मधुजीवन कां कोंडलें :
बाहेर हवा मोकळी, फुला रे,
उघड उघड पाकळी !

तमसंकुल सरली निशा;
नीलारुण हसली उषा :
चौफेर विभा फाकली, फुला रे,
उघड उघड पाकळी !

मलयानिल उदयांतला
बघ, शोधत फिरतो तुला :
कां मृदुल तनू झाकली, फुला रे,
उघड उघड पाकळी !

कीं रहस्य हृदयांतलें
आंतल्या आंत ठेवलें :
ही तुझी कल्पना खुळी, फुला रे,
उघड उघड पाकळी !
गीत - ना. घ. देशपांडे
संगीत - व्ही. डी. अंभईकर
स्वर- माणिक वर्मा
गीत प्रकार - भावगीत
  
टीप -
• काव्य रचना- १९४४.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.