A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
आभाळ कोसळे जेव्हा

आभाळ कोसळे जेव्हा कोठले छत्र शोधावे?
सारे जग रुसल्यावरती चिमण्यांनी कोठे जावे?

छाया न पित्याची पाठी, आईची न दिसली माया
पालवीही फुटण्याआधी वठलेली अमुची काया
या दगडी भिंतीपुढती रडगाणे कुठवर गावे?

चत्कोर भाकरी का रे वाट्यास आमुच्या नाही?
असहाय साखळ्या भारी आहेत आमुच्या पायी
कोणाच्या पुढती अमुचे चिमुकले हात पसरावे?

बोलका पुरावा आम्ही तुमच्या त्या सौजन्याचा
जातसे जीवही ज्याने तो खेळच दुर्जनतेचा
तुटल्या माळेमधले मणी फिरुनी कसे जुळावे?