A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
आधी कळस मग पाया रे

कसे चालले असेल जग हे, विचार याचा वाया रे
ही मायेची किमया अवघड, आधी कळस मग पाया रे !

वाफेमधुनी उपजे पाणी, बीज फळाच्या पोटी रे
शिशिर जाळतो झाडेवेली नव्या वसंतासाठी रे
मुळे वरी अन्‌ खाली फांद्या अशी मानवी काया रे !

पृथ्वीवरती निळा घुमट हा आभाळाचा राही रे
आभाळावर वसली पृथ्वी नीट न्याहाळुनी पाही रे
उजेड मारी अंधारा पण त्याची आई छाया रे !

पोट फाडल्यावाचून धरणी बीज धरीना रोपाचे
पुण्याईच्या खोडा फुटती नवे धुमारे पापाचे
पापावाचून पुण्याईच्या कशा पोसतील राया रे !

कळसावरती असतो पाया, पायावरती कळस चढे
चक्रगतीने फिरते जग हे, अंतामागे जन्म घडे
तोयनिधीतून मेघ जन्मती, तेच निर्मिती तोया रे !
गीत - ग. दि. माडगूळकर
संगीत - सुधीर फडके
स्वर- सुधीर फडके
चित्रपट - आधी कळस मग पाया
गीत प्रकार - चित्रगीत
तोय - पाणी.
धुमारा - झाडाला नवी फुटलेली जोरदार फांदी.
राई - अरण्य, झाडी / मोहरी.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.