A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
आकाशी झेप घे रे

आकाशी झेप घे रे पाखरा
सोडी सोन्याचा पिंजरा

तुजभवती वैभव-माया
फळ रसाळ मिळते खाया
सुखलोलुप झाली काया
हा कुठवर वेड्या घेसी आसरा

घर कसले ही तर कारा
विषसमान मोती-चारा
मोहाचे बंधन द्वारा
तुज आडवितो हा कैसा उंबरा

तुज पंख दिले देवाने
कर विहार सामर्थ्याने
दरीडोंगर हिरवी राने
जा ओलांडुनी या सरिता-सागरा

कष्टाविण फळ ना मिळते
तुज कळते परि ना वळते
हृदयात व्यथा ही जळते
का जीव बिचारा होई बावरा?

घामातून मोती फुलले
श्रमदेव घरी अवतरले
घर प्रसन्‍नतेने नटले
हा योग जीवनी आला साजिरा
गीत - जगदीश खेबूडकर
संगीत - सुधीर फडके
स्वर- सुधीर फडके
चित्रपट - आराम हराम आहे
राग / आधार राग - यमन, देस, तिलककामोद
गीत प्रकार - चित्रगीत
कारा - कारावास.
लोलुप - अतिलोभी.
सरिता - नदी.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.