A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
आले वयात मी बाळपणाची

आले वयात मी, बाळपणाची संगत सुटली
गोर्‍या गाली प्रीतिची लाली अवचित उठली!

निशिदिनी, बाइ, मी मनामध्ये तळमळते
ही नवखिच कसली हुरहुर मज जाळते
जीव होतो गोळा
झोप नाही डोळा
येतो दाटुन गळा
सख्यासोबतिणींची मला संगत नकोशी वाटली!

तू जिवलग माझा, बाळपणातिल मैत्र
बोल हसुन जरा, बघ, फुलांत नटला चैत्र
एका ठायी बसू
गालागालांत हसू
डोळा मोडून पुसू
चार डोळे भेटता दोन मने एकवटली!
गीत- शान्‍ता शेळके
संगीत - आनंदघन
स्वर - लता मंगेशकर
चित्रपट- राम राम पाव्हणं
गीत प्रकार - चित्रगीत
ठाय - स्थान, ठिकाण.
निशिदिनी - अहोरात्र.