A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
​आसुसली माती पिकवाया

​आसुसली माती, पिकवाया मोती
आभाळाच्या हत्ती आता पाऊस पाड गा !

मेघांच्या राजाला जाऊन सांग
ढगांनी काजळु दे डोंगरांची रांग
डोंगराच्या तळी, करपली काळी
हराळीची मुळी पुन्हा घेऊ दे वाढ गा !
आभाळाच्या हत्ती आता पाऊस पाड गा !

चारा नाही गाऊल्यांना, दूध नाही वासरां
धाराविना पेरा नाही, कोण आम्हा आसरा?
नदी नाला आटे, काळजात तुटे
वृंदावनी वठे दारी तुळशीचं झाड ग !
आभाळाच्या हत्ती आता पाऊस पाड गा !

धरणीच्या पोटात साठू दे ओल
रुजू दे बियाण गवतात खोल
ओल्यावर उन्हं, निवतील मनं
कुबेराचे धन मग मोत्याला मोड गा !
आभाळाच्या हत्ती आता पाऊस पाड गा !
गीत - ग. दि. माडगूळकर
संगीत - सुधीर फडके
स्वर- सुधीर फडके
चित्रपट - कुबेराचं धन
गीत प्रकार - चित्रगीत
कुबेर - देवांचा खजिनदार / श्रीमंत व्यक्ती.
निवणे - शांत होणे.
हरळी - आरोळी, मोठ्याने मारलेली हाक / एक प्रकारचे गवत.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.