A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
आता कसली चोरी ग

त्याची माझी प्रीत अलौकीक दिशा जाणती चारी ग
आता कसली चोरी ग

तो नगरीचा झाला राजा
मी म्हणते पण केवळ माझा
त्याच्या भवती धरिती फेरा स्वप्‍ने माझी सारी ग
आता कसली चोरी ग

फुलात दिसती त्याचे डोळे
सुगंधात सहवास दरवळे
स्मरणे त्याच्या घेई लालिमा कांती माझी गोरी ग
आता कसली चोरी ग

वावरता मी त्याच्या मागे
पदापदावर सुदैव जागे
सप्तपदीला विलंब का मग तोरण विलसो दारी ग
आता कसली चोरी ग
गीत - ग. दि. माडगूळकर
संगीत - सुधीर फडके
स्वर- आशा भोसले
चित्रपट - देवमाणूस
गीत प्रकार - चित्रगीत