A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
ऐरणीच्या देवा तुला

ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे
आभाळागत माया तुझी आम्हावरी र्‍हाउं दे

लेऊं लेनं गरिबीचं
चनं खाऊं लोखंडाचं
जिनं व्हावं आबरूचं
धनी मातुर माजा देवा, वाघावानी असू दे

लक्षुमीच्या हातातली
चवरी व्हावी वरखाली
इडापीडा जाईल, आली-
किरपा तुझी, भात्यातल्या सुरासंगं गाउं दे !

सुख थोडं दु:ख भारी
दुनिया ही भली-बुरी
घाव बसंल घावावरी
सोसायाला झुंजायाला अंगी बळ येऊं दे !
गीत - जगदीश खेबूडकर
संगीत - आनंदघन
स्वर- लता मंगेशकर
चित्रपट - साधी माणसं
राग - भूप, नट
गीत प्रकार - चित्रगीत
इडापिडा - सर्व दु:ख, संकट.
ऐरण - ज्यावर अलंकार, भांडी घडवतात तो ठोकळा.
चवरी (चामर) - वनगाईच्या केसांच्या झुबक्यास सोने अथवा चांदीची दांडी बसवून देव, राजा किंवा इतर मोठी व्यक्ति यांच्या अंगावरील माशा वगैरे उडवण्यासाठी केलेले कुंच्यासारखे साधन.
भाता - वारा भरण्याची कातड्याची पिशवी.