A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
अजून उजाडत नाही ग (१)

अजून उजाडत नाही ग !

दशकांमागुन सरली दशके
अन्‌ शतकांच्या गाथा ग
ना वाटांचा मोह सुटे वा
ना मोहाच्या वाटा ग
पथ चकव्याचा गोल, सरळ वा- कुणास उमगत नाही ग
प्रवास कसला? फरफट अवघी ! पान जळातून वाही ग
अजून उजाडत नाही ग !

कधी वाटते 'दिवस' 'रात्र' हे
नसते काही असले ग
त्यांच्यालेखी रात्र सदाची
ज्यांचे डोळे मिटले ग
स्पर्श आंधळे, गंध आंधळे, भवताली वनराई ग
तमातली भेसूर शांतता ! कानी कूजन नाही ग
अजून उजाडत नाही ग !

एकच पळभर एखादी कळ
अशी सणाणून जाते ग
क्षणात विरती अवघे पडदे
लख्ख काही चमचमते ग
ती कळ सरते, हुरहुर उरते अन्‌ पिकण्याची घाई ग
वरवर सारे शिंपण, काही आतुन उमलत नाही ग
अजून उजाडत नाहीफ़ ग !
गीत - संदीप खरे
संगीत - सलील कुलकर्णी
स्वर- सलील कुलकर्णी
अल्बम - सांग सख्या रे
गीत प्रकार - कविता
कूजन - आवाज.
तम - अंधकार.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.