आले संत घरीं तरी काय बोलुन शिणवावें?
उंस गोड लागला म्हणून काय मुळासहीत खावे?
प्रीतीचा पाहुणा झाला म्हणून काय फार दिवस रहावे?
गांवचा पाटील झाला म्हणून काय गांवच बुडवावे?
अरे कृष्णा ! अरे कान्हा ! मनरंजनमोहना
देव अंगी आला म्हणून काय भलतेंच बोलावें
चंदन शीतळ झाला म्हणून काय उगळुनिया प्यावे
भगवी वस्त्रें केलीं म्हणून काय जगच नाडावें
आग्या विंचू झाला म्हणून काय कंठीच कवळावे
अरे कृष्णा ! अरे कान्हा ! मनरंजनमोहना
परस्त्री सुंदर झाली म्हणून काय बळेच ओढावी
सुरी सोन्याची झाली म्हणून काय उरींच मारावी
मखमली पैजार झाली म्हणून काय शिरीच बांधावी
अरे कृष्णा ! अरे कान्हा ! मनरंजनमोहना
सद्गुरू सोयरा झाला म्हणून काय आचार बुडवावा
नित्य देव भेटला म्हणून काय जगाशीं दावावा
घरचा दिवा झाला म्हणून काय आढ्याशी बांधावा
एका जनार्दनी ह्मणे हरी हा गुप्तची ओळखावा
अरे कृष्णा ! अरे कान्हा ! मनरंजनमोहना
गीत | - | संत एकनाथ |
संगीत | - | शाहीर साबळे |
स्वर | - | शाहीर साबळे |
गीत प्रकार | - | लोकगीत, संतवाणी |
आग्या | - | ज्याच्या मुखातून अग्नीच्या ज्वाळा निघतात |
देव अंगी येणे | - | देवाचा संचार अंगात होणे. |
पैजार | - | पायात घालायचा जोडा, पायतणे. |
भगवी वस्त्रे करणे | - | संन्यास घेणे. |
अरे कृष्णा ! अरे कान्हा ! मनरंजनमोहना
संत आले घरीं तरी काय बोलुन शिणवावे?
उंस गोड झाला म्हणून काय मुळासहीत खावा?
प्रीतीचा पाहुणा झाला म्हणून काय फार दिवस राहवा?
गांवचा पाटेल झाला म्हणून काय गांवच बुडवावा?
अरे कृष्णा ! अरे कान्हा ! मनरंजनमोहना
देव आंगी आला म्हणून काय भलतेंच बोलावें?
चंदन शीतळ झाला म्हणून काय उगळून प्यावा?
वडील रागें भरला म्हणून काय जिवेंच मारावा?
भगवी वस्त्रें केलीं म्हणून काय जगच नाडावें?
अरे कृष्णा ! अरे कान्हा ! मनरंजनमोहना
आग्या विंचु झाला म्हणून काय कंठींच कवळावा?
फुकाचा हत्ती झाला म्ह्णून काय भलत्यांनी न्यावा?
फुकट हिरा झाला न्हणून काय कथिलीं जोडावा?
नित्य व्याज खातो म्हणून काय मुद्दल बुडवावें?
अरे कृष्णा ! अरे कान्हा ! मनरंजनमोहना
परस्त्री सुंदर झाली म्हणून काय बळेंच भोगवी?
सखा मित्र झाला म्हणून काय बाईल मागावी?
सोन्याची सुरी झाली म्हणून काय उरींच मारावी?
मखमली पैंजनें झालीं म्हणून काय शिरींच वंदावीं?
अरे कृष्णा ! अरे कान्हा ! मनरंजनमोहना
सद्गुरू सोयरा झाला म्हणून काय आचार बुडवावा?
नित्य देव भेटे तरी काय जगाशीं दावावा?
घरचा दिवा झाला म्हणून काय आडनीं बांधावा?
एका जनार्दनी ह्मणे हरी हा गुप्तची वोळखावा
अरे कृष्णा ! अरे कान्हा ! मनरंजनमोहना