A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
अशी ही थट्टा

बरी नव्हे थट्टा, बरी नव्हे थट्टा, बरी नव्हे थट्टा
भल्याभल्यास लाविला बट्टा, अशी ही थट्टा

ब्रह्मदेव त्रैलोक्याला शोधी
थट्टेने हरवली बुद्धी
केली नारदाची नारदी
अशी ही थट्टा

थट्टा दुर्योधनानं हो केली
पांचाळी सभेत गांजिली
गदाघावे मांडी फोडिली
अशी ही थट्टा

थट्टेने दुर्योधन मेला
भस्मासुर भस्म की हो झाला
वालीही मुकला प्राणाला
अशी ही थट्टा

थट्टा रावणाने त्या केली
सोन्याची लंका बुडविली
थट्टा ज्याची त्यास भोवली
बरी नव्हे थट्टा

थट्टेतून सुटले चौघेजण
शुक भीष्म आणि हनुमान
चौथा कार्तिकस्वामी जाण
त्याला नाही बट्टा

एका जनार्दनीं सर्वांला
थट्टेला भिऊन तुम्ही चाला
नाहीं तर नरककुंडाला
अशी ही थट्टा
गीत - संत एकनाथ
संगीत - मधुकर पाठक
स्वर- शाहीर साबळे
गीत प्रकार - लोकगीत, संतवाणी
गांजणे - छळणे, जाचणे.
थट्टा - उपहास.
नारदी - नारद मुनींनी एकदा वृंदारण्यातील कौसुम सरोवरात स्‍नान केले, ज्या कारणे त्यांचे पौरुषत्व नष्ट होऊन स्‍त्रीत रूपांतर झाले व त्यांस 'नारदी' हे नाव प्राप्त झाले.
बट्टा - कलंक.
मूळ रचना

अशी ही थट्टा । भल्याभल्यासि लाविला बट्टा ॥१॥
ब्रह्मदेव त्रैलोक्याला शोधी । थट्टेनें हरविली बुद्धी ।
केली नारदाची नारदी । अशी ही थट्टा ॥२॥
थट्टा दुर्योधनानें केलीं । पांचाळी सभेमाजीं आणिली ।
गदाघायें मांडी फोडिली । अशी ही थट्टा ॥३॥
थट्टा गेली शंभोपाशीं । कलंक लाविला चंद्रासी ।
भगें पाडिली इंद्रासी । बरी नव्हे थट्टा ॥४॥
थट्टेनें मेला दुर्योधन । भस्मासूर गेला भस्म होऊन ।
वालीहि मुकला आपुला प्राण । अशी ही थट्टा ॥५॥
थट्टा रावणानें केली । नगरी सोन्याची बुडविली ।
थट्टा ज्याची त्यास भोंवली । बरी नव्हे थट्टा ॥६॥
अरण्यांत होता भृगु ऋषी । थट्टा गेली त्याचेपाशीं ।
भुलवुनी आणिला अयोध्येसी । बरी नव्हे थट्टा ॥ ७ ॥
विराटराजाचा मेहुणा । नाम तयाचें कीचक जाणा ।
त्याणें घेतलें बहुतांचे प्राणा । बरी नव्हे थट्टा ॥८॥
थट्टेपासून सुटलें चौघेजण । शुक भीष्म आणि हनुमान ।
चौथा कार्तिकस्वामी जाण । त्याला नाहीं बट्टा ॥९॥
एका जनार्दनीं ह्मणे सर्वांला । थट्टेला भिउनी तुह्मीं चाला ।
नाहीं नेईल नरककुंडाला । अशी ही थट्टा ॥१०॥

  संपूर्ण कविता / मूळ रचना

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.