A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
बाळा जो जो रे

बाळा जो जो रे
पापणीच्या पंखांत झोपू दे डोळ्यांची पाखरे !

झोपी गेल्या चिमण्या-राघू
चिमण्या राजा नकोस जागू
हिरव्या पानावरी झोपली वेलींची लेकरे !

पुरे खेळणे आता बाळा
थांबव चाळा थांबव वाळा
वनदेवींनी उघडी केली स्वप्‍नांची मंदिरे !

मेघ पांढरे उशास घेउनी
चंद्र-तारका निजल्या गगनी
शब्द ऐकते झोपेमधुनी चावळते वारे !
घुंगुरवाळा - घुंगरे लावलेला लहान मुलाच्या पायांतला पैंजण.
चावळणे - बरळणे.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.