A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
भूवरी रावणवध झाला

देवहो, बघा रामलीला
भूवरी रावणवध झाला

दाहि दिशांचीं मुखें उजळलीं
कंपरहित ती अवनी झाली
रविप्रभेतें स्थिरता आली
पातली महद्भाग्यवेला

'साधु साधु' वच वदती मुनिवर
छेडुं लागले वाद्यें किन्‍नर
प्रमोद उसळे भूलोकावर
सुरांचा महारिपू मेला

रणीं जयांचे चाले नर्तन
नृपासहित हे विजयी कपिगण
श्रीरामांचे करिती पूजन
वाहुनी फुलें, पर्णमाला

'जय जय' बोला उच्चरवाने
कल्पतरूंचीं फेका सुमनें
फेका रत्‍नें, मणीभूषणें
जयश्री लाभे सत्याला

श्याम राम हा धर्मपरायण
हा चक्रायुध श्रीनारायण
जगदोत्पादक त्रिभुवनजीवन
मानवी रामरूप ल्याला

हा उत्पत्ति-स्थिति-लयकारक
पद्मनाभ हा त्रिभुवनतारक
शरण्य एकच खलसंहारक
आसरा हाच ब्रह्मगोलां

वत्सलांछना धरुनी वक्षीं
संतसज्जनां हा नित रक्षी
हा सत्याच्या सदैव पक्षीं
जाणतो हाच एक याला

हा श्री विष्णू, कमला सीता
स्वयें जाणता असुन, नेणता
युद्ध करी हें जगताकरितां
दाखवी अतुल रामलीला
गीत - ग. दि. माडगूळकर
संगीत - सुधीर फडके
स्वराविष्कार- सुधीर फडके
∙ आकाशवाणी प्रथम प्रसारण
( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. )
राग - मिश्र मारुबिहाग
गीत प्रकार - गीतरामायण, राम निरंजन
  
टीप -
• गीतरामायण.
  • प्रथम प्रसारण दिनांक- १/३/१९५६
  • आकाशवाणीवरील प्रथम प्रसारण स्वर- समूहगान.
अवनि - पृथ्वी.
कपी - वानर.
कमला - लक्ष्मी.
कल्पतरू - कल्पवृक्ष, इंद्रलोकांतील काल्पनिक वृक्ष. इच्छित वस्तू देतो अशी समजूत आहे.
किन्‍नर - उपदेवता, देवलोकींचे गायक.
खल - अधम, दुष्ट.
चक्रायुध - विष्णू.
नेणता - अजाण.
नृप - राजा.
पद्मनाभ - विष्णू.
प्रभा - तेज / प्रकाश.
प्रमोद - आनंद.
रिपु - शत्रु.
लांछन - डाग / कलंक.
वत्स - मूल.
सुमन - फूल.
सुर - देव.
स्वये - स्वत:
साधु साधु - धन्य धन्य.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.


Random song suggestion
  सुधीर फडके
  आकाशवाणी प्रथम प्रसारण