A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
बोलणे नको अता

बोलणे नको अता असेच मूक राहूया
सांजरंगी रंगले क्षितिज मात्र पाहूया

अबोध काहीसे असे मनास जो न वाटले
फुलाफुलांत येथल्या सुवास तेच दाटले
धुंद गंध तो जरा उरी भरून घेऊया

गूज अंतरातले तरल फुलपाखरू
श्वास ज्या न साहवे, स्पर्श त्या कसा करू?
चित्र रम्य हालते नित्य नयनी ठेवूया

मिळून दूर जाहल्या क्षणैक दोन सावल्या
गहन या तमी कुणी लक्ष ज्योती लावल्या
तो प्रकाश आगळा जन्म जन्म लेवूया