A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
चल चल चंद्रा पसर चांदणे

चल चल चंद्रा पसर चांदणे
किती बाई आम्ही वाट पाहणे

मावळतीची मुग्ध पश्चिमा
लपवी अपुला लाल रक्तिमा
झुळकत झुळकत बिलगायाला
सायंवारा दुरुनि आला
तोहि गुणगुणे एकच गाणे

तळ्‍यात अवखळ जललहरींनी
धरिला अमुच्या फेर भवतिनी
नाचत नाचत अमुच्या भवती
नाजुक गुजगोष्टी कुजबुजती
छुमछुम घुमवित किरण-पैंजणे

चमचमणार्‍या लाख चांदण्या
तळ्यात आल्या फेर नाचण्या
तया संगती तळ्यात खाली
वेलीवरुनी फुले उतरली
पुरे पुरे पूर्वेस सजविणे

वार्‍यावरती गगनामधुनी
अलगद उतरे रजनी राणी
क्षणभर झाला निसर्ग निश्चल
उमलायाची घटिका मंगल
आली ना रे, का मग छ्ळणे?
गुज - गुप्‍त गोष्ट, कानगोष्ट.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.