A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
चला निघू या सरसावोनी

चला निघू या सरसावोनी देशाच्या उद्धरणी!

विस्कटलेले अवघे जीवन खंत जयांना याची
पडती स्वप्‍ने उत्थानाची उज्ज्वल भवितव्याची
जागरूक अभिमानी असले असती जे जे कोणी!

उधाणलेल्या जलधीसंगे यावा झंझावात
तशी देउनी पराक्रमाला अभिमानाची साथ
परक्यांची या टाकू पुसुनी येथिल नावनिशाणी!

त्रिखंडात दुमदुमुनी जावी जरि राष्ट्राची कीर्ती
कार्यमग्‍नता जीवन व्हावे मृत्यू ही विश्रांती
भेद विरावे स्फुरण चढावे नवशुभ आकांक्षांनी!

ईर्ष्या अमुची कधी नसावी क्षणिक पुराचे पाणी
'कसे व्हायचे' अशी नसावी खचलेली जनवाणी
हासत जावे काट्यांवरुनी तरुणांनी अनवाणी!

उठता आपण नमतिल विघ्‍ने महाभयंकर आता
काय न केला आपण मर्दन तुंग हिमालय माथा?
विलंब का मग आणू वैभव लीलेने जिंकोनी!!
गीत- नाना पालकर
संगीत -
स्वर -
गीत प्रकार - स्फूर्ती गीत
जलधी - समुद्र.