A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
चला सख्यांनो हलक्या हाते

चला सख्यांनो, हलक्या हाते नखानखांवर रंग भरा
ग, नखांनखांवर रंग भरा

आज सावलीपरी जायचे त्यांच्यामागे पाऊल ग
पायी पैंजण बांधा द्याया आगमनाची चाहूल ग
सिंहकटीवर स्वैर खेळु द्या रत्‍नमेखला सैल जरा

बाहूंवरती बांधा बाई बाहुभुषणे नागाची
अंचली झाका हृदयावरची कमळे ही अनुरागाची
गळ्यांत घाला हार साजिरा, पदकी त्याच्या दिव्य हिरा

वेणी गुंफा मदनबाण वर भवती हिरवा मरवा ग
आकाशातील नक्षत्रांसम माथी मोती जडवा ग
सौभाग्याच्या नगरा नेते सौंदर्याचा थाट पुरा
अंचल - पदर, ओचा.
अनुराग - प्रेम, निष्ठा.
कटि - कंबर.
मेखला - कमरपट्टा.
मदनबाण - एक प्रकारचे पांढरे, सुवासिक फूल.
मरवा - सुगंधी पाने असलेली एक वनस्पती.