A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
दही घाल हातावरती

दही घाल हातावरती रणा बाळ जाई
चुडा तुझा सावित्रीचा गडे सूनबाई

नको पाणवू ग डोळे, नको अशी पाहू
रणांगणी गेले याचे वडील, दोन भाऊ
रणांगणी रमतो मरतो मराठा शिपाई

बडिवार वंशाचा या तुला का न ठावा?
वेड झुंजण्याचे आहे तुझ्या आडनावा
अशा निरोपाची नाही घरा या नवाई

शिवप्रभु इतके बाई जुने हे घराणे
सांगतात सनदा याद्या कीर्तीची पुराणे
पुरुष पुरुष वंशातील या खेळला लढाई

युद्ध हीच तारुण्याला असे तीर्थयात्रा
पाहू दे हिमाद्री याला नदी ब्रह्मपुत्रा
विरहदु:ख कुंक्वासंगे कपाळास लेई

फार काय सांगू बाळे, बोलवे न आता
दुवा तुला देते आहे एक वीरमाता
गळा परि दाटून येतो, रडे आत आई
बडिवार - प्रतिष्ठा / मोठेपणा.
सनद - सरकारी शिक्कापत्र.