A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
देते कोण देते कोण

चिमुकल्या चोचीमधे आभाळाचे गाणे
मातीतल्या कणसाला मोतियाचे दाणे
उगवत्या उन्हाला या सोनसळी अंग
पश्चिमेच्या कागदाला केशरिया रंग
देते कोण देते कोण देते कोण देते?

सूर्यासाठी उषा आणि चंद्रासाठी निशा
घरी परतण्यासाठी पाखरांना दिशा
मध खाते माशी तरी सोंडेमधे डंख
चिकटला कोळी त्याच्या पायाखाली डिंक
देते कोण देते कोण देते कोण देते?

नागोबाच्या फण्यावर दहाचा आकडा
खेकड्याच्या प्रवासाचा नकाशा वाकडा
करवंदाला चिक आणि अळूला या खाज
कुणी नाही बघे तरी लाजाळूला लाज
देते कोण देते कोण देते कोण देते?

मुठभर बुल्बुल, हातभर तान
कोकिळेला गुरू नाही तरी गाई गान
काजव्याच्या पोटातून जळे गार दिवा
पावसाच्या अगोदर ओली होते हवा
देते कोण देते कोण देते कोण देते?

भिजे माती आणि तरी अत्तर हवेत
छोट्या छोट्या बियांतून लपे सारे शेत
नाजुकशा गुलाबाच्या भवतीने काटे
सरळशा खोडावर पुढे दहा फाटे
देते कोण देते कोण देते कोण देते?

आभाळीच्या चंद्रामुळे लाट होते खुळी
पाण्या नाही रंग तरी नदी होते निळी
भुईतून येतो तरी नितळ हा झरा
चिखलात उगवून तांदूळ पांढरा
देते कोण देते कोण देते कोण देते?

बी, पान, फूल, फळ
कधी काय? कधी काय?
आधी बी, आधी फळ
कसे काय? कसे काय?
उलटी पोळी झाडावर
अशी काय? कशी काय?
मेणात मध, मधात साखर
कशी काय? कशी काय?
थंडी, पाऊस, धम्मक ऊन
कोण देते हे ठरवून?
देता काय? देता काय?
कोण देते? कसे काय? कधी काय? कोठे काय?
गीत - संदीप खरे
संगीत - सलील कुलकर्णी
स्वर- सलील कुलकर्णी
गीत प्रकार - बालगीत

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.