A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
धन्य मी शबरी

धन्य मी शबरी श्रीरामा !
लागलीं श्रीचरणें आश्रमा

चित्रकुटा हे चरण लागतां
किती पावले मुनी मुक्तता
वृक्षतळिं या थांबा क्षणभर, करा खुळीला क्षमा

या चरणांच्या पूजेकरितां
नयनिं प्रगटल्या माझ्या सरिता
पदप्रक्षालन करा, विस्मरा प्रवासांतल्या श्रमां

गुरुसेवेंतच झिजलें जीवन
विलेपनार्थे त्याचे चंदन
रोमांचांचीं फुलें लहडलीं, वठल्या देहद्रुमा

निजज्ञानाचे दीप चेतवुन
करितें अर्चन, आत्मनिवेदन
अनंत माझ्या समोर आलें, लेवुनिया नीलिमा

नैवेद्या पण काय देउं मी?
प्रसाद म्हणुनी काय घेउं मी?
आज चकोरा-घरीं पातली, भुकेजली पौर्णिमा

सेवा देवा, कंदमुळें हीं
पक्व मधुरशीं बदरिफळें हीं
वनवेलींनीं काय वाहणें, याविन कल्पद्रुमा?

क्षतें खगांचीं नव्हेत देवा,
मीच चाखिला स्वयें गोडवा
गोड तेवढीं पुढें ठेविलीं, फसवा नच रक्तिमा

कां सौमित्री, शंकित दृष्टी?
अभिमंत्रित तीं, नव्हेत उष्टीं
या वदनीं तर नित्य नांदतो, वेदांचा मधुरिमा
गीत - ग. दि. माडगूळकर
संगीत - सुधीर फडके
स्वराविष्कार- सुधीर फडके
∙ आकाशवाणी प्रथम प्रसारण
( गायकांची नावे कुठल्याही विशिष्ट क्रमाने दिलेली नाहीत. )
राग - शुद्ध सारंग
गीत प्रकार - गीतरामायण, राम निरंजन
  
टीप -
• गीतरामायण.
  • प्रथम प्रसारण दिनांक- १८/११/१९५५
  • आकाशवाणीवरील प्रथम प्रसारण स्वर- मालती पांडे.
अनंत - विष्णू / अंत नसलेला.
अभिमंत्रण - आमंत्रण.
अर्चन - पूजा.
क्षत - जखम / टोचणी.
खग - पक्षी.
चकोर - चांदणे हेच ज्याचे जीवन असा एक पक्षी.
चित्रकूट - प्रयागच्या दक्षिणेस १० मैलांवरचा डोंगर. याच्या उत्तरेस मंदाकिनी नदी वाहते.
द्रुम - वृक्ष, झाड.
प्रक्षाळणे - धुणे.
बदरी - बोरीचे झाड.
मधुरिमा - गोडवा.
शबरी - एक भिल्लीण. श्रीरामांची एकनिष्ठ भक्तीण.
सरिता - नदी.
स्वये - स्वत:
सौमित्र - लक्ष्मण (सुमित्रेचा पुत्र).

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.


  सुधीर फडके
  आकाशवाणी प्रथम प्रसारण