A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
दिसते मजला सुखचित्र नवे

दिसते मजला सुखचित्र नवे
मी संसार माझा रेखिते!

प्रीत तुझीमाझी फुलावी या फुलत्या वेलीपरी
भाव मुके ओठांत यावे गंध जसा सुमनांतरी
शब्दाविना मनभावना अवघ्याच मी तुज सांगते!

हात तुझा हाती असावा साथ तुझी जन्मांतरी
मी तुझिया मागून यावे आस ही माझ्या उरी
तुजसंगती क्षण रंगती निमिषात मी युग पाहते!

स्वर्ग मिळे धरणीस जेथे रंग नवे गगनांगणी
सप्तसुरा लेवून यावी रागिणी अनुरागिणी
तुझियासवे सुखवैभवे सौभाग्य हे नित्‌ मागते!
गीत- शान्‍ता शेळके
संगीत - अनिल-अरुण
स्वर - अनुराधा पौडवाल
चित्रपट- अष्टविनायक
राग- पहाडी
गीत प्रकार - चित्रगीत
अनुराग - प्रेम, निष्ठा.
निमिष - पापणी लवण्यास लागणारा काळ.