A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
गगनसदन तेजोमय

गगनसदन तेजोमय
तिमिर हरून करुणाकर
दे प्रकाश देई अभय

छाया तव, माया तव
हेच परम पुण्यधाम
वार्‍यातून तार्‍यांतून
वाचले तुझेच नाम
जग जीवन जनन मरण
हे तुझेच रूप सदय

वासंतिक कुसुमांतून
तूच मधुर हासतोस
मेघांच्या धारांतून
प्रेमरूप भासतोस
कधी येशील चपलचरण
वाहिले तुलाच हृदय

भवमोचन हे लोचन
तुजसाठी दोन दिवे
कंठातील स्वर मंजुळ
भावमधुर गीत नवे
सकलशरण मनमोहन
सृजन तूच, तूच विलय
गीत - वसंत बापट
संगीत - पं. हृदयनाथ मंगेशकर
स्वर- लता मंगेशकर
चित्रपट - उंबरठा
राग / आधार राग - तिलककामोद
गीत प्रकार - चित्रगीत, प्रार्थना
भवमोचन - संसारातून सोडवणारा.
सृजन - निर्मिती.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.