A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
घन रानी साजणा

घन रानी साजणा!
मी कशी तुझ्यासवे
चुकले वाट रे, सांग ना
घन रानी साजणा!

भिरभिर वार्‍याची
थरथर पाण्याची
अवखळ सजणी मी
मनभर गाण्याची
तरी बाई सूर नवेनवे
सुखद मधुर वाटतात हवे, या मना
घन रानी साजणा!

मधुमय समय असा
बहरुन कुंज हसे
तरळत गंध नवा
वय ते लावी पिसे
इथे तिथे गोड निळेपण
बावरते मन साद घालि कोण, यौवना?
घन रानी साजणा!

किती अधीर अधीर भाषा प्रीतीची
मन माझे, मन माझे, मन बोलत नाही ग माझे
किती लाजे, किती लाजे, वेडे लाजरे मन ग माझे
एक शपथ शपथ त्याला भीतीची
हृदया रे, अदया रे, बोल ना
घन रानी साजणा!
गीत- शान्‍ता शेळके
संगीत - श्रीधर फडके
स्वर - आशा भोसले
गीत प्रकार - भावगीत
कुंज - वेलींचा मांडव.
पिसे - वेड.
​प्रेमात पडणं म्हणजे सगळ्या जगाला विसरून स्वप्‍नांच्या दाट हिरव्या वनात हरवून जाणं.
मग या हरवून जाण्यात चकवा होतो, भुलावा होतो, पायांखालची वाट वेगळीच वाटायला लागते, आपण चुकत तर नाही ना, असा प्रश्नही पडतो क्षणभर. पण अवखळ मनाचा या वाटेवरचा प्रवास थांबवणं आपल्या हातात नसतं, ते वार्‍यावर भिरभिरत, पाण्यावर तरंगत, गात-नाचत फिरत रहातं.

प्रेमाची अधीर भाषा मूकपणानेच जाणून घ्यावी लागते, असे भाव शान्‍ताबाई शेळकेंनी हळव्या, अलवार शब्दांत गुंफले. त्यांना श्रीधर फडके यांनी तरल संगीतात बांधले आणि आशाताईंचा अवखळ आवाज या अल्लड प्रीतीचं गुज आपल्यापर्यंत घेऊन आला.
तर अशी ही या घनरानी चुकलेल्या वाटेची कहाणी.

('आठवणीतली गाणी'वर प्रसिद्ध झालेले ब्लॉग्ज कॉपी-पेस्ट करणे अनधिकृत आणि अनैतिक आहे. या लिखाणाचा कुठल्याही प्रकारे वापर करण्याआधी लेखकाची परवानगी घेणे बंधनकारक आहे.)