A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
हा दैवगतीचा फेरा

ज्या झाडांनी दिली सावली त्यांना नाही छाया
वात्‍सल्याच्या उन्हात जळते ओली ममता-माया

हा दैवगतीचा फेरा
कलीयुगी या उलटा-सुलटा खेळ असे हा सारा

तळहाती जपले ज्याला, का भूल पडावी त्याला
देव्हार्‍यातील दैवत घेई का वळचणीस थारा
खेळ असे हा सारा, हा दैवगतीचा फेरा

कष्टाचे डोंगर पुढती ही गतजन्‍मीची झडती
शरीर थकले तरी शिरावर आयुष्याचा घारा
खेळ असे हा सारा, हा दैवगतीचा फेरा

स्वप्‍नांना गहिवर फुटला की काळीज धागा तुटला
अमृत ज्यांनी दिले तयांच्या नयनी अश्रुधारा
खेळ असे हा सारा, हा दैवगतीचा फेरा