A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
इवल्याइवल्याशा

इवल्याइवल्याशा
टिकल्याटिकल्यांचे
देवाचे घर बाई उंचावरी
ऐक मजा तर ऐक खरी !

निळीनिळी वाट
निळेनिळे घाट
निळ्यानिळ्या पाण्याचे झुळुझुळु पाट
निळ्यानिळ्या डोंगरांत निळीनिळी दरी !
ऐक मजा तर ऐक खरी !

चांदीच्या झाडांना सोन्याची पाने
सोनेरी मैनेचे सोनेरी गाणे
सोन्याची केळी, सोन्याचा पेरू
सोनेरी अंब्याला सोन्याची कैरी !
ऐक मजा तर ऐक खरी !

देवाच्या घरात गुलाबाची लादी
मऊमऊ ढगांची अंथरली गादी
चांदण्याची हंडी, चांदण्याची भांडी
चांदोबाचा दिवा मोठा लावला वरी !
ऐक मजा तर ऐक खरी !

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.