A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
जेथ घुमे मुरज जणू

जेथ घुमे मुरज जणू मेघ गर्जना
ती अलका वर्णु किती, सांगु तुज घना

सुख होउनि अश्रु जिथे नेत्रि वाहते
वित्तेशा वय न जिथे कधि वाढते
विरहव्यथा जिथ न प्रीत भांडणाविना

मंदाकिनि-तीरावर वायु वाहती
मंदारांची छाया ऊन वारती
क्रीडति कन्या त्यास्तव अमर-प्रार्थना

करि कमळे क्रीडेस्तव, कुंद कुंतली
कोरांटी शिरिषफुले कानि गुंतली
फुलवित तू तो कदंब भांग-शोभना

सदनांतुनि अक्षयधन, अप्सरांसवे
वैश्रवणाचा महिमा गात किति थवे
सुरगणिका उपवनात साथ दे कुणा

गंगेचा दूर जणू शालू होउनि
प्रियकर-अंकी बसली प्रणयिनी कुणी
ती नगरी ओळखशील सांगण्याविना
गीत - वसंतराव पटवर्धन
संगीत - पं. जितेंद्र अभिषेकी
स्वर- अजितकुमार कडकडे
गीत प्रकार - गीत मेघ, मालिका गीते, कविता
  
टीप -
• गीत क्रमांक ५
• 'गीत मेघ' - अनुवादित 'मेघदूत'मधून
• वाहिनी- सह्याद्री, कार्यक्रम - 'प्रतिभा आणि प्रतिमा' (१९८०)
• निवेदन- ज्योत्‍स्‍ना किरपेकर
• सादरकर्ते- अरुण काकतकर
• ध्वनीफीत सौजन्य- डॉ. वसंतराव पटवर्धन
अंक - मांडी.
कुंतल - केस.
कदंब (कळंब) - वृक्षाचे नाव.
गणिका - वेश्या.
मुरज - मृदंग.
वैश्रवण - कुबेर.
वारणे - दूर करणे / हाकणे.
वित्तेश - कुबेर.
शोभन - तेजस्वी, सुंदर.
सुर - देव.
संपूर्ण कविता

जेथ घुमे मुरज जणू मेघ गर्जना
ती अलका वर्णु किती, सांगु तुज घना

सुख होउनि अश्रु जिथे नेत्रि वाहते
वित्तेशा वय न जिथे कधि वाढते
विरहव्यथा जिथ न प्रीत भांडणाविना

सितमणि सौधावरती फुलत तारका
यक्षांना साथ देत रूपकन्यका
कल्पतरू-फल-मधुच्या करिती सेवना

मंदाकिनि-तीरावर वायु वाहती
मंदारांची छाया ऊन वारती
क्रीडति कन्या त्यास्तव अमर-प्रार्थना

रमणकरी सैल निरी वस्त्र निसटला
रत्‍नदिवे विझविण्यास चूर्ण फेकिता
वावरती विफल जरी यक्ष अंगना

करि कमळे क्रीडेस्तव, कुंद कुंतली
कोरांटी शिरिषफुले कानि गुंतली
फुलवित तू तो कदंब भांग-शोभना

सदनांतुनि अक्षयधन, अप्सरांसवे
वैश्रवणाचा महिमा गात किति थवे
सुरगणिका उपवनात साथ दे कुणा

कनककमल कानावरले किती गळे
केसांतुनि माळलि ती ढळत किति फुले
अभिसारा मार्ग कुठे सांगती खुणा

गंगेचा दूर जणू शालू होउनि
प्रियकर-अंकी बसली प्रणयिनी कुणी
ती नगरी ओळखशील सांगण्याविना

  संपूर्ण कविता / मूळ रचना

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.