A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
झाला महार पंढरीनाथ

झाला महार पंढरीनाथ
काय देवाची सांगू मात?

नेसला मळिण चिंधोटी
घेतली हातामधी काठी
घोंगडी टाकिली पाठी
करी जोहार दरबारात !

मुंडाशात बांधिली चिठी
फेकतो दुरुन जगजेठी
'दामाजीनं विकली जी कोठी-
त्याचं घ्यावं दाम पदरात !'

खळखळा ओतिल्या मोहरा
'घ्या जी मोजून, पावती करा'
ढीग बघून चमकल्या नजरा
शहा घाली बोट तोंडात !
जोहार - प्रणाम / शूद्रांनी करावयाचा रामराम.
मुंडासे - पागोटे.
मळीण - घाणेरडा / गंजलेला.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.