A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
झुंजार माणसा झुंज दे

झुंज झुंज झुंज,

झुंजार माणसा झुंज दे, हेच तुझे रे काम
माणूस असुनी माणूस करतो माणूसकी बदनाम

लढले दानव लढले मानव
कधी न सरले अकांडतांडव
युगायुगाचे असे युद्ध हे नाही त्यास विराम

भयाण सुटला वादळ वारा
दंड थोपूनी ये सामोरा
बलदंडाला खेचुन खाली बनवी त्यास गुलाम

भलेपणाच्या माथी लाथा
होय आंधळी मदांध सत्ता
रावणास या ठेचायाला होशिल का तू राम

दुर्बलतेला द्याया मुक्ती
मिळे तुजला अमोघ शक्ती
दुष्कर्माचा विनाश करण्या हो गीतेतील शाम

नजर करारी निधघडी छाती
झेप तुझी परि अजाण होती
कैक संकटे लपुनी बसली करावया संग्राम

उठला वणवा वैर भडकले
नरपशुनी थैमान घातले
माणुसकीला लुटू पहातो अमानुषी उद्दाम

वार विषारी घाव जिव्हारी
रक्त रंगली काया सारी
हिम्मत धरुनी चाल एकला घेवु नको विश्राम

हार जीतीची पर्वा नाही
प्राणप्रणाने झुंझत राही
सत्कर्याला भिऊ नको तू कर्म करी निष्काम
गीत - जगदीश खेबूडकर
संगीत - राम कदम
स्वर- सुधीर फडके
चित्रपट - झुंज
गीत प्रकार - चित्रगीत
अकांडतांडव - रागाचे फाजील भाषण.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.