A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
जीवनगाणे गातच रहावे

जीवनगाणे गातच रहावे
झाले गेले विसरुनि जावे, पुढे पुढे चालावे
जीवनगाणे गातच रहावे!

सात सुरांचा हा मेळा व्यापुन उरला विश्वाला
हृदये हलता वरखाली ताल मिळे या गाण्याला
तुमच्यामाझ्या श्वासांमधुनी आकारा यावे
जीवनगाणे गातच रहावे!

चिमणाबाई हिरमुसली, गाल फुगवुनी का बसली?
सान बाहुली ही इवली, लटकीलटकी का रुसली?
रुसलीरुसली खुदकन हसली, पापे किति घ्यावे!
जीवनगाणे गातच रहावे!

मातीमधुनी अंकुरली चैतन्याची दीपकळी
आनंदाने थरथरली कधी अंतरी गहिवरली
या मातीला या प्रीतिला हितगुज सांगावे
जीवनगाणे गातच रहावे!
सान - लहान.
हितगूज - हिताची गुप्‍त गोष्ट.

 

  उषा मंगेशकर, महेंद्र कपूर