A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
काय दिसावे ठायी ठायी

काय दिसावे ठायी ठायी मार्ग कठिण कापता
सुचवितो असशिल जरि जाणता

किती भेटतिल मेघा सरिता
वाहतील ज्या तुझियाकरिता
वागीव त्यांना प्रेम-आदरे, जी ज्यांची योग्यता

दिसेल तुजला प्रथम नर्मदा
विंध्यतळाशी विशीर्ण जलदा
जणू गजांगी कुणी जाहला नक्षीला विरचिता

भेटावी तुज मग वेत्रवती
विदिशा नगरीतुनी वाहती
विषयविलासा पिउनी घेशिल नीळ तिचे चाखता

गंभीरेच्या जळी नीरदा
तुझी पडावी छाया सुखदा
तिचा ओळखुनि कटाक्ष चंचल देऊ नको विफलता

नभगंगेला, चर्मण्वतीला
सरस्वतीला, भागीरथीला
वंदन करुनी जा कैलासा, पथ हा आक्रमिता
गीत - वसंतराव पटवर्धन
संगीत - पं. जितेंद्र अभिषेकी
स्वर- अजितकुमार कडकडे
गीत प्रकार - गीत मेघ, मालिका गीते, कविता
  
टीप -
• गीत क्रमांक ३
• 'गीत मेघ' - अनुवादित 'मेघदूत'मधून
• वाहिनी- सह्याद्री, कार्यक्रम - 'प्रतिभा आणि प्रतिमा' (१९८०)
• निवेदन- ज्योत्‍स्‍ना किरपेकर
• सादरकर्ते- अरुण काकतकर
• ध्वनीफीत सौजन्य- डॉ. वसंतराव पटवर्धन
जलद - मेघ.
नीरद - मेघ.
विरचित - जुळविलेले, रचलेले.
विशीर्ण - जीर्ण.
विषयवासना (विषय) - कामवासना.
सरिता - नदी.
संपूर्ण कविता

काय दिसावे ठायी ठायी मार्ग कठिण कापता
सुचवितो असशिल जरि जाणता

किती भेटतिल मेघा सरिता
वाहतील ज्या तुझियाकरिता
वागीव त्यांना प्रेम-आदरे, जी ज्यांची योग्यता

दिसेल तुजला प्रथम नर्मदा
विंध्यतळाशी विशीर्ण जलदा
जणू गजांगी कुणी जाहला नक्षीला विरचिता

उग्र तिच्या तू उदका सेवी
जांभुळराई ज्याला अडवी
वन्य गजांच्या मदे येत त्या सुगंध, मादकता

रेवाजल ते घेता पिउनी
तुला न उडविल वारा चुकुनी
संपन्‍नांना सर्व गौरवित, नच थारा रिक्ता

भेटावी तुज मग वेत्रवती
विदिशा नगरीतुनी वाहती
विषयविलासा पिउनी घेशिल नीळ तिचे चाखता

पश्चिमेला लेउनि दाविल
आवर्ताच्या स्थळी नाभिस्थल
निर्विध्येचा जाणुन घे तू विभ्रम अडखळता

तीरतरुंची पाने पडली
जलवेणी जिचि बारिक झाली
त्या सिंधूस्तव उपाय योजी, जाइ जये कार्श्यता

चाटुकार जणु प्रणय सुखास्तव
क्षिप्रावारा तसाच वास्तव
पद्मपरिमले गंधित करितो प्रत्येका भेटता

गंभीरेच्या जळी नीरदा
तुझी पडावी छाया सुखदा
तिचा ओळखुनि कटाक्ष चंचल देऊ नको विफलता

नीलजलाचे वसन घसरले
जलवेतांच्या करांत धरले
विवस्त्रजघना अशी सोडुनि जाइ रसिक कोणता

नभगंगेला, चर्मण्वतीला
सरस्वतीला, भागीरथीला
वंदन करुनी जा कैलासा, पथ हा आक्रमिता

  संपूर्ण कविता / मूळ रचना

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.