A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
कर्तव्याने घडतो माणूस

विमोह त्यागून कर्मफलांचा सिद्ध होई पार्था
कर्तव्याने घडतो माणूस जाणून पुरुषार्था

शस्त्र त्याग तव शत्रू पुढती नच शोभे तुजला
कातर होसी समरी मग तू विरोत्तम कसला
घे शस्त्रा ते सुधीर होऊन रक्षाया धर्मार्था

कर्तव्याच्या पुण्य पथावर मोहांच्या फूलबागा
मोही फसता मुकशील वीरा मुक्तीच्या मार्गा
इह परलोकी अशांतीने तव विक्रम झुकवील माथा

कुणी आप्त ना कुणी सखा ना जगती जिवांचा
क्षणभंगुर ही संसृति आहे खेळ ईश्वराचा
भाग्य चालते कर्मपदांनी जाण खर्‍या वेदार्था

रंगहीन मी या विश्वाच्या रंगाने रंगलो
कौरवात मी, पांडवात मी, अणुरेणूत भरलो
मीच घडवितो, मीच मोडितो, उमज आता परमार्था

कर्मफलाते अर्पून मजला सोड अहंता वृथा
सर्व धर्म परि त्यजुनी येई शरण मला भारता
कर्तव्याची साद तुझ्या तुज सिद्ध करी धर्मार्था
गीत - मनोहर कवीश्वर
संगीत - मनोहर कविश्वर
स्वर- सुधीर फडके
गीत प्रकार - भावगीत
कातर - कापरा / आर्त.
भारता - भरतवंशज.
विमोह - मोहणे, भारणे.
सुधीर - दृढ, खंबीर मनाचा.
संसृति - संसार.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.