A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
केलेस पाप यक्षा त्याच्या

केलेस पाप यक्षा, त्याच्या फळास भोग
ऋतूचक्र पूर्ण एक साही सखीवियोग

ठावे न काय तुजला मी भक्त शंकराचा
फुटता दिशा सदैव परिपाठ पूजण्याचा
तो देव चंद्रमौळी गौरीश वीतराग

मी आज मंदिरासी पूजावयासी गेलो
करपाकळ्या मिटूनी मी कमळ वाहु गेलो
परि पद्मपाकळ्यांना आली करांत जाग

बाहेर ये उडोनि मकरंद एक काळा
रात्री चुकून होता कमळात बद्ध झाला
मज दंशिले तयाने, जणु तो द्विजिव्ह नाग

त्याच्याकडून कळले कमळास तोडीशी तू-
रात्री, मला न आला आतापर्यंत किंतू
कित्येक दिन तुझा हा फसवायचा प्रयोग

सखिची मिठी सुटेना, शरदातल्या पहाटे
कमळा कसे खुडाया जावे, असेच वाटे
प्रणयात तू प्रियेच्या होतास पूर्ण दंग

सोडुनिया तिला तू संवत्‍सरास एक
म्हणुनी इथुनी जाणे, बघ दूर रामटेक
पाप्या तुला क्षमा ना, होता असाच योग
गीत- डॉ. वसंतराव पटवर्धन
संगीत - पं. जितेंद्र अभिषेकी
स्वर - रामदास कामत
गीत प्रकार - भावगीत
  
टीप -
• गीत क्रमांक २
• 'गीत मेघ' - अनुवादित 'मेघदूत'मधून
• वाहिनी- सह्याद्री, कार्यक्रम - 'प्रतिभा आणि प्रतिमा' (१९८०)
• निवेदन- ज्योत्‍स्‍ना किरपेकर
• सादरकर्ते- अरुण काकतकर
• ध्वनीफीत सौजन्य- डॉ. वसंतराव पटवर्धन
वितराग - अनासक्त.
शशीमौळी (चंद्रमौली) - शंकर.
संवत्‍सर - वर्ष.

 

Random song suggestion
This 👇 player works on all android and iOS devices also
  रामदास कामत