A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
लपे करमाची रेखा

लपे करमाची रेखा
माझ्या कुंकवाच्या खाली
पुसूनिया गेलं कुंकू
रेखा उघडी पडली

देवा तुझ्याबी घरचा
झरा धनाचा आटला
धनरेखेच्या चर्‍यानं
तळहात रे फाटला

राहो लाल माझे सुखी
हेच देवाला मागणं
त्यांत आलं रे नशीब
काय सांगे पंचागन

नको नको रे जोतिषा
माझ्या दारी नको येऊ
माझं दैव मला कळे
नको हात माझा पाहू
गीत- बहिणाबाई चौधरी
संगीत - वसंत पवार
स्वर - आशा भोसले
चित्रपट- मानिनी (१९६१)
गीत प्रकार - चित्रगीत
मूळ स्वरुपात-

लपे करमाची रेखा
माझ्या कुंकवाच्या खालीं
पुशीसनी गेलं कुंकू
रेखा उघडी पडली

देवा, तुझ्याबी घरचा
झरा धनाचा आटला
धन-रेखाच्या चर्‍यानं
तयहात रे फाटला

बापा, नको मारूं थापा
असो खर्‍या असो खोट्या
नहीं नशीब नशीब
तयहाताच्या रेघोट्या

अरे नशीब नशीब
लागे चक्कर पायाले
नशिबाचे नऊ गिर्‍हे
ते भी फिरत राह्यले

राहो दोन लाल सुखी
हेच देवाले मांगनं
त्यांत आलं रे नशीब
काय सांगे पंचागन

नको नको रे जोतिषा
नको हात माझा पाहूं
माझं दैव माले कये
माझ्या दारीं नको येऊं.