A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
मैत्रिणींनो थांबा थोडं

मैत्रिणींनो थांबा थोडं खुशाल मागनं हसा!
चला इचारु या येडीला संसार करशील कसा?

गोरीपान ही काया कवळी, ओल्या हळदीनं होईल पिवळी
लगीन होता सासरी जाता जीव होईल ग पीसा!
पी पी सनई, तडाम्‌ चौघडा, पंचकल्याणी येईल घोडा
त्यावर दोघं बसा!

नको करु लई नट्टापट्टा, दीर-नणंदा करतील थट्टा
सासूवरती तोंड टाकुनी बोलु नको वसवसा
भरताराला नको मागणं मोकळा होईल खिसा

नाद नसावा शेजारणीचा, मंतर देतील कानफुटीचा
मनोमनी ग पती पुजावा देवावानी जसा!
दान-धर्माला म्होरं होऊन, कुणि भिकारी दारी पाहून
द्यावा ओंजळ पसा!

नव्या नवरीनं थोडं हसावं, सुगरणीवाणी काम दिसावं
घरंदाज या कुलशीलाचा वटीत घे ग वसा!

 

  कृष्णा कल्ले, पुष्पा पागधरे