A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
मला लागली कुणाची उचकी

आली आली सुगी म्हणून चालले बिगीबिगी
गोष्ट न्हाई सांगण्याजोगी
कुणी गालावर मारली टिचकी
मला लागली कुणाची उचकी

कुणाची ग कुणाची? ह्याची का त्याची? लाजू नको, लाजू नको

तरणीताठी, नार शेलाटी, चढले मी बांधावर
अटकर बांधा, गोरा गोरा खांदा, पदर वार्‍यावर
फडामध्ये चाहूल, वाजलं त्याचं पाऊल
माझ्या उरात भरली धडकी

निजले डाव्या कुशी, हाताची उशी, करून मी कशी
वार्‍याच्या लाटा, थंडीचा काटा, मनात न्यारी खुशी
सपनात आला, त्यानं छेडलं बाई मला
त्याच्या डोळ्याची नजर तिरकी

उठून सकाळी, ल‍ई येरवाळी, गेले पाणोठ्यावरी
उन्हात बसले न्हात, अंगाला पानी गुदगुल्या करी
पाण्यामध्ये दिसं, त्याचं लागलं मला पिसं
त्यानं माझीच घेतली फिरकी

रातदिसं जागते, वाट त्याची बघते, किती मी घालू साद
झोप माझी उडली, जादू कशी घडली, जाई ना त्याची याद
भेटीसाठी आले, मनी कासाविस झाले, मी माझी मलाच झाले परकी
गीत - जगदीश खेबूडकर
संगीत - राम कदम
स्वर- उषा मंगेशकर
चित्रपट - पिंजरा
गीत प्रकार - चित्रगीत, लावणी
अटकर - लहान, ठसठशीत.
पिसे - वेड.
येरवाळी - भल्या पहाटे, लवकर, नेहमीपेक्षा आधीची वेळ.
शेलाटी - कृश / बारीक.