A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
नकळत होते तुझी आठवण

नकळत होते तुझी आठवण !

कळ्या फुलांना हळुच हसविते
प्रेमळ निर्मळ उषा उगवते
दिवसाचे ते बघुन बालपण
नकळत होते तुझी आठवण !

हास्याचा कल्लोळ भोवती
भोजन करिता भरल्या ताटी
घास अडकता उचकी लागुन
नकळत होते तुझी आठवण !

सरे प्रीतिचे स्वप्‍न कोवळे
दोन सानुले विहग पांगले
चित्रपटांतिल प्रसंग पाहुन
नकळत होते तुझी आठवण !

करुनि जागरण कलिका सुकली
म्लान मुखाने घरी निघाली
चंद्रकोर गगनांतिल देखुन
नकळत होते तुझी आठवण !
गीत- शांताराम आठवले
संगीत - सुधीर फडके
स्वर - सुधीर फडके
चित्रपट-
गीत प्रकार - चित्रगीत
उषा - पहाट.
विहंग - विहग, पक्षी.