A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
नसे राउळी वा नसे मंदिरी

नसे राउळी वा नसे मंदिरी
जिथे राबती हात तेथे हरी !

जिथे भूमीचा पुत्र गाळील घाम
तिथे अन्‍न होऊन ठाकेल श्याम
दिसे सावळे रूप त्याचे शिवारी !

नको मंत्र त्याला मुनीब्राह्मणांचे
तया आवडे गीत श्वासां-घणांचे
वसे तो सदा स्वेदगंगेकिनारी !

शिळा फोडिती संघ पाथरवटांचे
कुणी कापसा रूप देती पटांचे
तयांच्या घरी नांदतो तो मुरारी !

जिथे काम तेथे उभा श्याम आहे
नव्हे धर्म रे घर्म ते रूप पाहे
असे विश्वकर्मा श्रमांचा पुजारी !
घर्म - घाम.
ठाकणे, ठाके - थांबणे / स्थिर होणे.
पट - वस्‍त्र / सोंगट्या, बुद्धिबळे इ. ज्यावर मांडतात ते वस्‍त्र.
पाथरवट - कष्टकरी.
राऊळ - देऊळ.
स्वेद - घाम.

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.