A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
ॐकारस्वरूपा सद्गुरू

ॐकारस्वरूपा सद्गुरू समर्था ।
अनाथाच्या नाथा तुज नमो ॥१॥

नमो मायबापा गुरुकृपाघना ।
तोडी या बंधना माया मोहा ॥२॥

मोहोजाळ माझें कोण निरशील ।
तुजवीण दयाळा सद्गुरुराया ॥३॥

सद्गुरुराया माझा आनंदसागर ।
त्रैलोक्या आधार गुरुराव ॥४॥

गुरुराव स्वामी असे स्वयंप्रकाश ।
ज्यापुढें उदास चंद्र-रवि ॥५॥

रवि शशि अग्‍नि नेणती ज्या रूपा ।
स्वप्रकाशरूपा नेणे वेद ॥६॥

एका जनार्दनीं गुरु परब्रह्म ।
तयाचें पैं नाम सदा मुखीं ॥७॥
नेणणे - न जाणणे.
नेणता - अजाण.
पैं - निश्चय्यार्थक.
मूळ रचना

ॐकारस्वरूपा सद्गुरु समर्था । अनाथाच्या नाथा तुज नमो ॥१॥
नमो मायबापा गुरु कृपाघना । तोडीं या बंधना माया मोहा ॥२॥
मोहोजाळ माझें कोण निरशील । तुजविण दयाळा सद्गुरुराया ॥३॥
सद्गुरुराय माझा आनंदसागर । त्रैलोक्या आधार गुरुराव ॥४॥
गुरुराव स्वामी असे स्वयंप्रकाश । ज्यापुढें उदास चंद्र रवी ॥५॥
रवि शशि अग्‍नि नेणती ज्या रूपा । स्वप्रकाशरूपा नेणे वेद ॥६॥
वेदां पडलें मौन शास्त्रें वेडावलीं । वाचा हे निमाली ते श्रीगुरु ॥७॥
श्रीगुरु जयासी पाहे कृपादृष्टी । तयासी हे सृष्टि पांडुरंग ॥८॥
पांडुरंग माझा दीनां मायबाप । नासी सर्व पाप भाव दूजा ॥९॥
दुजेपणा ठाव नाहीं जया रूपीं । तेथें आपेंआपीं मन रंगे ॥१०॥
रंगे चित्त माझें सद्‌गुरुचरणीं । स्वरूप निर्वाणीं होय गति ॥११॥
गति अधोगति दोनी या नासती । सद्गुरूची मूर्ति ध्यातां मनीं ॥१२॥
मनीं वसे ज्याच्या सद्गुरु दयाळ । तयासी सकळ सिद्धि हातीं ॥१३॥
हातीं मोक्ष परि नावडत्या ठायीं । सद्‌गुरूच्या पायीं बुद्धी राहे ॥१४॥
राहे गुरुगृहीं सदा सर्वकाळ । परब्रह्मीं केवळ होय जागा ॥१५॥
जागा शिष्य चित्त सद्गुरु वसती । केली असे स्थिति यम दमीं ॥१६॥
यमादिकीं चित्त जयाचें निर्मळ । तेथें तो गोपाळ वसे प्रभु ॥१७॥
प्रभुराज माझा स्वामी गुरुराव । देतो मज भाव शुद्ध भूमी ॥१८॥
भूमि शुद्ध करी ज्ञानबीज पेरी । अद्वैत हें धरी मी तूं नेणें ॥१९॥
नेणें मी तूं कांहीं द्वैताद्वैत भाव । एक स्वयंमेव आत्मा इती ॥२०॥
इति कर्तव्यता हीच दासालागीं । माया गुणसंगीं नाश तिचा ॥२१॥
तिचा नाश करणें हाचि येक थोरू । करिती सद्गुरु उपकार ॥२२॥
उपकारा त्यांच्या नोहे उतराई । ठेवीं जीव पायीं थोडा पहा ॥२३॥
पहा गुरुरायें ब्रह्म दाखविलें । अखंड स्मरविलें मज नाम ॥२४॥
नाम निरामय अज अविनाशी । प्रिय तें मानसीं सदां मज ॥२५॥
मज लागीं माझी सद्गुरु माउली । करी कृपा साउली वर्णूं काय ॥२६॥
काय वर्णूं माझ्या सद्गुरु दयाळा । बहुत कळवळा दासा यया ॥२७॥
यया दासा मनीं सद्‌गुरूचें ध्यान । झालासे तल्लीन गुरुपायीं ॥२८॥
एकाजनार्दनीं गुरु परब्रह्म । तयाचें पैं नाम सदा मुखीं ॥२९॥

संदर्भ- श्रीएकनाथ महाराजांच्या अभंगांची गाथा
संग्राहक- नानामहाराज साखरे
सौजन्य- इंदिरा प्रकाशन, पुणे.

  संपूर्ण कविता / मूळ रचना

Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.