नकोच जाणें मग शाळेला,
काम कुणी सांगेल न मजला,
मउ मउ गादी निजावयाला,
चैनच सारी । मौज हीच वाटे भारी
मिळेल सांजा, साबुदाणा,
खडिसाखर, मनुका, बेदाणा,
संत्रीं, साखरलिंबूं आणा;
जा बाजारीं । मौज हीच वाटे भारी
भवतीं भावंडांचा मेळा,
दंगा थोडा जरि कुणिं केला
मी कावुनि सांगेन तयाला,
'जा बाहेरी.' । मौज हीच वाटे भारी
कामें करतिल सारे माझीं,
झटतिल ठेवाया मज राजी,
बसेल गोष्टी सांगत आजी,
मज शेजारीं । मौज हीच वाटे भारी
असलें आजारीपण गोड
असून कण्हती कां जन मूढ?
हें मजला उकलेना गूढ-
म्हणुन विचारीं । मौज हीच वाटे भारी
| गीत | - | भानुदास |
| संगीत | - | श्रीधर फडके |
| स्वर | - | ज्योती बारसे |
| गीत प्रकार | - | बालगीत |
| कावणे | - | त्रासणे. |
| मूढ | - | गोंधळलेला / अजाण. |
| राजी | - | खूष / कबूल. |
आम्ही काही प्राध्यापक मंडळी तिथं बसलेली होतोच. कविता आमच्या सगळ्यांच्याच परिचयाची. अत्रे-घाटे-संपादित 'नवयुग वाचनमाले'च्या क्रमिक पुस्तकातून आमच्या पिढीने ती शाळेत अभ्यासिलेली आणि ऐकून इतरही सर्वांना आपोआप माहीत झालेली ! पण नवयुग वाचनमालेची ती क्रमिक पुस्तकं कॉलेजच्या लायब्ररीत असण्याचा संभव फारच कमी. म्हणून कोणत्या कवीची ती कविता आहे याचा अंदाज घेऊन त्याच्या काव्यसंग्रहातून ती शोधता आली तर पहावी, अशी कल्पना निघाली व संभाव्य कवींची नावं आम्ही आठवू लागलो.
तेवढचात 'नवे क्षितिज'चे संपादक, एशियाटिक सोसायटीच्या समितीवर असलेले आणि पाश्चात्य इतिहास-तत्त्वज्ञान-साहित्य-विचाराचे अभ्यासक श्री. विश्वास पाटील तिथं आले. तेही नेहमी येणार्यांतले. आमची चर्चा ऐकून त्यांनी वेगळाच 'बाँब' टाकला. ते म्हणाले, "तुम्हाला कुणाला या कवीच्या नावाची कल्पनाच करता येणार नाही. ही कविता भानू शिरधनकर यांची आहे."
आम्हांला आश्चर्याचा धक्काच बसला. शिकारकथा आणि अन्य प्रकारचं गद्य साहित्य लिहिणारे म्हणून भानू शिरधनकर हे नाव आमच्या माहितीचं होतं. काहींचा तर त्यांच्याशी व्यक्तिशः परिचय होता पण त्यांनी कधी कविता लिहिल्याचं आठवत नव्हतं.
"हीच तर गंमत आहे", पाटील सांगू लागले, "ही कविता 'भानुदास' या टोपणनावाखाली अत्र्यांच्या नवयुग वाचनमालेत समाविष्ट झाली आहे. 'चित्रमय जगत्' या नियतकालिकात ती प्रथम प्रसिद्ध झाली होती. त्या कवितेचा त्यांना त्या काळात दीड रुपया मोबदला मिळाला होता. त्यातल्या सव्वा रुपयाचा त्यांनी नवा शर्ट घेतला आणि उरलेल्या चार आण्यांत चमचमीत खाण्याची चंगळ केली. श्री. धनंजय कीर यांच्याकडे भानू शिरधनकरांचं यासंबंधीचं बोलणं चाललं होतं तेव्हा मी तिथे होतो. म्हणून तर मला इतकी खात्रीची माहिती."
..
..
याच सुमारास श्री. भानू शिरधनकर या नावाविषयी काही व्यक्तींनी शंका उपस्थित केल्याचं आमच्या कानावर आलं. त्यांमध्ये श्री. पू. रा. बेहेरे यांचं नाव असल्याचं समजताच श्री. बरवे यांनी त्यांना फोन केला. ते म्हणाले, "अहो, हे भानुदास म्हणजे भानू शिरधनकर नव्हेत आणि ही कविताही त्यांची नाही. ती आमच्या पोटे मास्तरांची कविता आहे. तेच भानुदास. मी शिरोड्याला शाळेत शिकत असताना आम्हांला शिकवायला ते होते. अनेकदा ते ही कविता स्वतः वर्गात गाऊनही दाखवायचे श्री. पोटे हे मूळ सांगलीचे. सांगलीचे सुप्रसिद्ध कवी साधुदास यांना ते गुरुस्थानी मानीत. या 'साधुदास' नावावरूनच भानुदास हे नाव त्यांनी स्वतःसाठी धारण केलं होतं."
दरम्यान 'महाराष्ट्र टाइम्स'मध्ये 'जावे ग्रंथांच्या गावा' या सदरात श्री. प्रदीप कर्णिक यांचा 'कथा - आठवणीतल्या कवितांची' हा लेख प्रसिद्ध झाला व तो खूप गाजला. मागोमाग त्याच आठवड्यात जयसिंगपूरहून प्रा. मोहन कृष्णाजी पोटे यांच आलेलं पत्र 'म. टा.' मध्ये प्रसिद्ध झालं. त्यात 'ती' कविता आपले वडील कृष्णाजी विनायक पोटे ऊर्फ भानुदास यांची असल्याचं त्यांनी लिहिलं होतं. श्री. बरवे यांनी प्रा. पोटे यांना पत्र लिहिलं. त्यावर प्रा. पोटे यांनी तत्परतेने, आपल्या वडिलांच्या कविता समाविष्ट असलेली पुस्तकं व त्यांच्या 'नवयुग वाचनमाले'तील 'पहुं आजारी' या कवितेच्या चेकसंबंधी कर्नाटक पब्लिशिंग प्रेसकडून आलेल्या पत्राची 'झेरॉक्स' प्रत इत्यादी साहित्य श्री. बरवे यांच्या माहितीसाठी पाठविलं. 'पहुं आजारी' ही कविता श्री. कृष्णाजी विनायक पोटे ऊर्फ भानुदास यांची असल्याचं स्पष्टच झालं. याला दुजोरा देणार्या आणखी काही व्यक्ती भेटल्या. पत्रं आली.
श्री. विश्वास पाटील यांनी सांगितलेली घटनाही शंभर टक्के खरी होती. मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागाचे भूतपूर्व रजिस्ट्रार श्री. पद्माकर एडवणकर हे पण त्या घटनेचे एक साक्षी आहेत… बहुधा शक्यता अशी आहे की श्री. भानू शिरधनकर यांचंही नाव 'भानुदास' होतं व ते त्यांच्या निकटच्या आप्तवर्तुळात माहीत होतं. त्यामुळे त्या दिवशी कवितेवरून काही बोलणं निघालं असताना हा 'इनोसंट जोक' करण्याची त्यांना त्या क्षणी लहर आली असावी. एरव्ही कुणालाही ते तसे सांगत नसत, अशी श्री. वा. वि. भट (अभिनव प्रकाशन) यांच्यासारखे शिरधनकरांचे निकटचे मित्र ग्वाही देतात.
(संपादित)
रमेश तेंडुलकर
'आठवणीतल्या कविता (१)' या पुस्तकातून.
सौजन्य- मौज प्रकाशन गृह, मुंबई.
* ही लेखकांची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.












इतर संदर्भ लेख