A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
पाऊस आला वारा आला

पाऊस आला वारा आला
पान लागले नाचू
थेंब टपोरे गोरे गोरे
भरभर गारा वेचू!

गरगर गिरकी घेते झाड
धडधड वाजे दार कवाड
अंगणातही बघता बघता
पाणी लागे साचू!

अंगे झाली ओलीचिंब
झुलू लागला दारी लिंब
ओली नक्षी पाऊसपक्षी
कुणी पाहतो वाचू!

ओसरुनी सर गेली रे
उन्हे ढगांतुन आली रे
इंद्रधनुष्यामध्ये झळकती
हिरे माणके पाचू!
कवाड - दरवाजाची फळी, दरवाजा.
पाचू (पाच) - एक प्रकारचे रत्‍न.