A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
पिवळी पिवळी हळद लागली

पिवळी पिवळी हळद लागली भरला हिरवा चुडा
वधु लाजरी झालीस तू ग सांगे तो चौघडा!

बाजुबंद त्या गोठपाटल्या बिलवर नक्षीदार
तुझ्या हृदी ग कुणी छेडिली रतिवीणेची तार
सांग कुणी ग अंगठीत या तांबुस दिधला खडा!

मुंडावळी या भाळी दिसती काजळ नयनांगणी
करकमळापरी कुणी गुंफिले सुवासिनीचे मणी
आठवणींचा घेउन जा तू माहेराचा घडा!

स्वप्‍नफुलांसह रमत रहा तू प्रेमळ संसारी
भाग्यवेल ती मोहरेल ग उद्या तुझ्या दारी
सौख्य पाहता भिजु दे माझ्या डोळ्यांच्या या कडा!
गीत- मधुकर जोशी
संगीत - वसंत प्रभू
स्वर - सुमन कल्याणपूर
गीत प्रकार - भावगीत
बिलवर - उच्‍च प्रतीची काचेची बांगडी.