A Non-Profit Non-Commercial Public Service Initiative by Alka Vibhas   
प्रथम तुज पाहता

प्रथम तुज पाहता जीव वेडावला
उचलुनी घेतले नीज रथी मी तुला

स्पर्श होता तुझा विसरलो भान मी
धुंद श्वासातला प्राशिला गंध मी
नयन का देहही मिटुनी तू घेतला

जाग धुंदीतुनी मजसी ये जेधवा
कवळुनी तुजसी मी चुंबिले तेधवा
धावता रथ पथी पळभरी थांबला
गीत- ग. दि. माडगूळकर
संगीत - सुधीर फडके
स्वर - रामदास कामत
चित्रपट- मुंबईचा जावई
राग- कलावती
गीत प्रकार - चित्रगीत
जेधवा - जेव्हा.
तेधवा - तेव्हा.
'प्रथम तुज पाहता' हे 'मुंबईचा जावई' या सिनेमातलं गाणं लक्षात राहतं ते गदिमांच्या शब्दांसाठी आणि रामदास कामत यांच्या गायनासाठी. तरीही सगळ्यात प्रभाव पडतो तो अरुण सरनाईक यांच्या अभिनयाचा.

चित्रपटातील प्रसंग असा आहे- कथेतील हे पात्र नाटकात काम करते आहे. त्यातील गाण्याचा सराव घरी चालू आहे. म्हणजे गाणं चित्रपटातलं असलं तरी जायला नाट्यगीताच्या वळणाने हवं.. तरी ते नाटकात गायल्यासारखं अभिनीत न होता, चित्रपटातील प्रसंगानुसार, पत्ते खेळता खेळता सादर व्हायला हवं. अरुण सरनाईक यांच्यासारखा कसदार, संयत अभिनेताच हे आव्हान पेलू शकतो. ते स्वत: उत्तम गायक होते. त्यामुळे त्यांचा येथील अभिनय अधिक सशक्त झाला आहे.

अगदी असंच हिंदीतील अभिनेत्री नूतन यांच्याविषयी बोललं जातं. 'मोरा गोरा अंग लै ले', 'मनमोहना, बड़े झूठे', 'काली घटा छाये मोरा जिया तरसाये' ही गाणी, आशाताईंच्या गाण्यासाठी ऐकावीत तशीच नूतनजींच्या गातानाच्या अभिनयासाठी पहावीत, असं म्हणतात. नूतनजीही उत्तम गायच्या.

'सांग सख्या तुज काय हवे' हे त्यांनी गायलेले मराठी गाणे आहे. १९७७ सालच्या 'पारध' या चित्रपटातील. हा चित्रपट त्यांच्या कारकिर्दीच्या उत्तरार्धातला. या काळातील त्यांच्या अभिनयाची पडझड लक्षात घेतली तरी नूतनजींनी गायलेले मराठी गाणं म्हणून याचे वैशिष्ट्य नक्कीच राहील.

('आठवणीतली गाणी'वर प्रसिद्ध झालेले ब्लॉग्ज कॉपी-पेस्ट करणे अनधिकृत आणि अनैतिक आहे. या लिखाणाचा कुठल्याही प्रकारे वापर करण्याआधी लेखकाची परवानगी घेणे बंधनकारक आहे.)

 

This 👇 player works on all android and iOS devices also
  रामदास कामत