प्रभातीच येशी सारा जागवीत गाव
विधाता जगाचा तूचि उधळीत आशा
उजळिशी येतायेता सभोवती जग दिशा
रथ तुझा सोनियाचा धावे भरधाव
अंधारास प्रभा तुझी गिळे प्रभाकर
दिवसा तू ज्ञानदीप लावी दिवाकर
सृष्टीला या चैतन्याचा तुझा पेहराव
पुष्पपत्रदानाची रे तुला नसे आस
तूच चालुनिया येशी माझिया घरास
भक्ताठायी गुंतलासे तुझा भक्तिभाव
| गीत | - | गंगाधर महाम्बरे |
| संगीत | - | वीणा चिटको |
| स्वर | - | रामदास कामत |
| राग / आधार राग | - | भूप |
| गीत प्रकार | - | प्रार्थना |
| ठाय | - | स्थान, ठिकाण. |
मास्तरांच्या अनेक सांगीतिक घटनांच्या वीणाताई प्रत्यक्ष साक्षीदार होत्या. तसेच मास्तरांच्या बर्याच सांगीतिक कार्यांमध्ये कोरस मधील गायिका, मैफलींमधील स्वरसाथसंगतकार असा त्यांचा सक्रिय सहभाग असायचा. वीणाताईंनी संगीतबद्ध केलेल्या गाण्यांच्या सुरांवटींतून मधूनच मास्तरांच्या संगीताचा प्रभाव निश्चितच दिसून येतो. परंतु मास्तर कृष्णरावांसारख्या प्रतिभावान पित्याच्या छायेत राहून देखील त्यांनी स्वयंप्रकाशित तार्यासारखे स्वतंत्र बाजाचे संगीत निर्माण केले, हे विशेष !
सत्तरच्या दशकात वीणा चिटको यांनी संगीतबद्ध केलेल्या भावगीतांच्या एचएमव्ही कंपनीने दोन ध्वनिमुद्रिका प्रकाशित केल्या. त्या ध्वनिमुद्रिकांचा विक्रमी खप झाला. या उल्लेखनीय कार्याबद्दल एचएमव्ही कंपनीच्या 'मराठी भावगीत प्रकारातील पहिल्या स्त्री-संगीतकार' म्हणून एचएमव्हीने विशेष कार्यक्रम आयोजित करून त्यात वीणाताईंचा जाहीर सत्कार केला. या ध्वनिमुद्रिकांमधील 'अंबरातल्या निळ्या घनाची', 'मन माझे भुलले', 'वाटे भल्या पहाटे', 'सांग प्रिये' अशा त्यांनी संगीतबद्ध केलेल्या अत्यंत सुश्राव्य गाण्यांवर मराठी रसिकांनी भरभरून प्रेम केले. ही सर्व गीते पं. रामदास कामत यांनी गायली होती. तोपर्यंत पं. कामत यांचे नाट्यगीत गायक म्हणून चांगलेच नाव झाले होते. परंतु त्यांनी भावगीत कधी गायले नव्हते. वीणाताईंच्या संगीत दिग्दर्शनाखाली त्यांनी प्रथम भावगीत हा प्रकार गायला. त्यांच्याकडून तरल आवाजात हळुवारपणे गीतातील भावभावना व्यक्त होण्यासाठी वीणाताईंनी संगीतकार म्हणून खूप मेहनत घेतली होती.
या एचएमव्हीच्या ध्वनिमुद्रिकांतील सर्वच गीते गाजली. यामधील 'पूर्वेच्या देवा तुझे सूर्यदेव नाव' हे भावगीत विशेष प्रसिद्ध झाले. खरं तर हे भावगीत म्हणजे सुर्यदेवाची तेजस्वी आरतीच ! अनेक वर्षे रोज सकाळी आकाशवाणीवरील कार्यक्रमांचा प्रारंभ ह्या गाण्याच्या सुरेल सुरावटीने व्हायचा. ते सूर ऐकणार्या श्रोत्यांना आपली सकाळ रविकिरणांनी तेजाळून गेल्यासारखी वाटायची. उगवलेला दिवस त्या तेजस्वी सूरांच्या मंगलमय बरसातीत अक्षरशः न्हाऊन निघायचा. वीणाताईंनी स्वरबद्ध केलेल्या ह्या सुमधुर भावगीताचे गायक वर उल्लेख केल्याप्रमाणे पं. रामदास कामत आहेत, तर कवी श्री.गंगाधर महांबरे हे या गीताचे गीतकार आहेत.
हे तेजस्वी गीत स्वरबद्ध करून मराठी भावगीतांचे विश्व समृद्ध करणार्या श्रीमती वीणा चिटको यांचे १९ सप्टेंबर २०१५ रोजी वृद्धापकाळाने निर्वाण झाले. खरं म्हणजे अशा अवीट गोडीच्या गाण्यावर स्वरसाज चढवणारा कलावंत देहाने जरी आपल्यातून निघून गेला तरी त्याने निर्माण केलेल्या कलाकृतीतून तो कलावंत रसिकांच्या हृदयाच्या हळव्या कोपर्यात कायम वास्तव्य करून राहात असतो.
(संपादित)
प्रिया फुलंब्रीकर
स्वरप्रतिभा दिवाळी अंक २०२३
संपादक- प्रवीण प्रभाकर वाळिंबे
* ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत. या लेखात व्यक्त झालेली मते व मजकूर यांच्याशी 'आठवणीतली गाणी' सहमत किंवा असहमत असेलच, असे नाही.
Please consider the environment before printing.
कागद वाचवा.
कृपया पर्यावरणाचा विचार करा.












इतर संदर्भ लेख